आंदरूडच्या विनायकराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या मुलाची सोशल मिडियावर भावनिक पोस्ट व्हायरल : नेटकर्यांमध्ये हळहळ तर काहींना अश्रू अनावर..!

पिलीव/सुजित सातपुते
आबा आज एक वर्ष झालं तुम्ही आम्हाला सोडून गेलात त्याला , आजही तुम्ही या जगात नाही यावर विश्वास बसत नाही, एकही दिवस असा जात नाही की तुमची आठवण आली नाही,आजही कधी तुमच्या नंबरवरून घरून फोन आला तरी काळजात चर्रर्र होतं आणि मनात काहूर माजतं ,तुमच्या सोबत घालवलेले क्षण आठवतात, सुट्टीला घरी आल्यानंतर रोज तुम्ही मला कुठेनाकुठेतरी फिरायला घेऊन जात ,बाप असून मित्रअसल्यासारखं वागलात,चूक असेल तिथं फटकारलं, चांगले संस्कार करताना कुठलीही कसर ठेवली नाही,खेडेगावात राहून कमी शिक्षण झालेलं असताना देखील शिक्षण ही काळाची गरज आहे हे तुम्ही जाणून होता ,’शिक्षण हे वाघीणेचं दूध आहे जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ असं तुम्ही नेहमी म्हणायचा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आम्हा तिघा भावनडांना शिकवलं ते आयुष्यात कधीही न विसरण्याजोगे आहे,आजही कुठलाही तुमच्या ओळखीचा व्यक्ती भेटल्यावर तुमची आठवण निघताच त्याचा डोळ्यात तरळणारं पाणी हे तुम्ही त्या व्यक्तीवर किती जीव लावला होता याची साक्ष देतं खरंच पैशापेक्षा प्रेमाने,आपुलकीनेसुद्धा जग जिंकता येतं हे तुम्ही दाखवून दिलं ,असं म्हणतात की एखाद्या माणसाची श्रीमंती ही त्याच्या जवळ असणाऱ्या पैशापेक्षा त्याच्या दारात असणाऱ्या चपलांच्या गर्दीवरून समजते या उक्तीप्रमाणे आबा तुम्ही फार श्रीमंत होता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही,कुटुंबावर देखील तितकंच प्रेम केलं, एखाद्यावर तोंड टाकलं तरी परत येऊन त्याला सॉरी म्हणायला सुद्धा तितकच विशाल ह्रदय असावं लागतं ते तुच्याजवळ नक्कीच होतं.बंधुप्रेमाचा तर तुम्ही आदर्शच घालून दिला, आबा तुमची प्रत्येक गोष्ट कुणालाही भारावुन टाकेल अशीच होती.राजकारण म्हणजे तुमचा श्वास होता,अत्यंत दांडगा जनसंपर्क,कुशल नेतृत्व, उत्तम वक्तृत्व ,माणसांची पारख,असे बरेच गुण तुमच्याजवळ होते,तुम्ही राजकारणात बरेच चढ उतार सोसले परंतु आयुष्यभर स्वाभिमानाने जगलात त्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही.तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक मला फार जवळून बघण्याचा योग आला हे माझं भाग्य समजतो कारण त्यावेळी राजकारणाबरोबरच तुमच्यामध्ये असणारी जिद्द,चिकाटी,पराकोटीची मेहनत,आत्मविश्वास,कितीही बिकट परीस्थिती आली तरी निडर होऊन छातीठोकपणे तिला कसं सामोरं जायचं हे सगळं बघायला मिळालं…….शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं आबा हे सारं येतं कुठून.एक वर्ष झालं “आबा” म्हणून हाक नाही मारली, हे वाक्य लिहताना मात्र छाती भरून आली आणि आपसूक डोळ्यातुन पाणी वाहू लागलं परंतु आता तुमच्या आठवणींची शिदोरी घेऊन जाण्यापलिकडे व तुम्ही शिकवलेल्या व दाखवलेल्या मार्गाने चालत राहण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *