आरोग्य विभाग पंचायत समिती माळशिरस यांच्याकडून पिलीव परिसरामध्ये कोरोना संदर्भात जनजागृती..!
पिलीव/सुजित सातपुते
कोरोना विषाणू संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व सेवा व कर्तव्य सुरू असून तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका व एकमेकांशी संपर्क सुरू आहे.आत्तापर्यंत माळशिरस तालुक्यात कोणताही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.

मात्र पिलीव,शिंगोर्णी,बचेरी,कोळेगाव,तांदुळवाडी,सुळेवाडी,फळवणी आदी भागात मुंबई आणि पुणे येथून अनेक प्रवासी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते की या मुंबई पुणेवाल्यांपासून आपल्याला कोरोनाची लागण होतेय कि काय ? परंतु या लोकांच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी व त्यांच्या मनातील शंकेचे निवारण करण्यासाठी माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे व डॉ.संतोष माने-देशमुख यांच्या टिमने व आशा स्वयंसेविका यांनी वरील संबंधित गावांना भेटी देऊन जनजागृती केली.तसेच प्राथमिक उपचार करुन ग्रामपंचायतीच्या वतीने स्पीकरवर जनजागृती करण्यात आली.त्यामुळे पिलीवसह परिसरातील लोकांच्या मनामध्ये मुंबई,पुणेवाल्यांबद्दल असणारी भिती निघून गेली आहे.मात्र उद्याच्या जनता कर्फ्यूचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले तर आज रात्रीचे 12 तास अधिक उद्याचे 14 तास आणि उद्याच्या रात्रीचे 12 तास म्हणजे एकुण 38 तास कोरोना विषाणूला मानवी शरीरात प्रवेश मिळणार नाही आणि असे झाले तर आपण सहज कोरोनावर विजय मिळवू शकतो.त्यामुळे सर्व लोकांनी उद्याच्या जनता कर्फ्यूचे पालन करणे गरजेचे असल्याचे तसेच त्या पुढील काळातही शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान या वेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.