अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासून धिंड काढू – विकासदादा धाईंजे
पिलीव/सुजित सातपुते
छ.शिवाजी महाराज व फुले,शाहू,आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात प्रजासत्ताकदिनी काही जातीयवादी बांडगुळांनी एक निंदणीय घटना घडवून आणली आहे.प्रजासताकदिना दिवशीच माळशिरस तालुक्यातील खुद्द तांबवे गावच्या सरपंचालाच ग्रामपंचायत समोरील झेंडा वंदन करण्यास काही जातीयवादी लोकांनी विरोध केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सदर प्रकरणातील संबधितांवर कठोर कारवाई कारवाई करण्याची मागणी दक्षता कमिटीचे माळशिरस तालुका सदस्य विकासदादा धाईंजे,सरपंच ज्ञानू शंकर भोसले यांच्यासह तालुक्यातील दलित संघटनांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील तांबवे या गावाची लोकसंख्या साधारण तीन हजाराच्या आसपास आहे. २०१५ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्ञानु शंकर भोसले यांची राखीव जागेनुसार सरपंचपदी निवड झाली होती. मात्र त्यांनी कारभार स्वीकारल्यापासून त्यांना सरपंच असल्याचे या बांडगूळांनी कधी भासूच दिले नाही.सरपंच झाल्यानंतर काही दिवस त्यांना सरपंचाच्या खुर्चीवरही बसण्यास विरोध करण्यात आला होता.कालच झालेल्या ७१ व्या प्रजासत्ताकदिना दिवशी तर चक्क सरपंचाला झेंडावंदन करण्यापासूनच रोखण्यात येत असेल तर सामान्य नागरिकांना या जातीयवाद्यांपासून किती त्रास सोसावा लागत असेल असे धाईंजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सदरील घटने संदर्भात सरपंच भोसले यांनी गटविकास अधिकारी व पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला असून गटविकासाधिकार्यांचा अहवाल अल्यानंतर संबंधितांवर पोलिसाधिकारी कठोर कारवाई करतीलच परंतु तात्काळ कार्यवाही न झाल्यास या प्रकरणास जो कोणी संबंधित दिसेल तिथेच त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची धिंड काढू अशा तीव्र शब्दात विकासदादा यांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.