म्हसवड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे पिलिव येथे सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे त्याविरोधात रोडवेज सोल्युशन्स या कंपनीस ताकीद देण्यासाठी युवा सेनेच्या वतीने युवासेना माळशिरस विधानसभा प्रमुख शिवराज पुकळे यांनी आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन दिले आहे. सध्या म्हसवड पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पिलीव येथे मुख्य गावालगत तसेच बसस्थानकावर सुरू आहे. मात्र या मुख्य ठिकाणी काम सुरू असताना एका बाजूचा रस्ता करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे .
सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे एकेरी वाहतुकीने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून दुचाकी वाहने, चार चाकी वाहने ,एसटी बसेस व इतर खासगी वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे .या रस्त्याने जवळपास तीन ते चार शाळेचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे आपण योग्य ती उपाययोजना करून सुरक्षा पुरवावी जेणेकरून याठिकाणी अपघात किंवा जीवितहानी होणार नाही तसेच काम चालू असणाऱ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा फलक लावलेले नाहीत त्यामुळे बरेच अपघात आतापर्यंत झालेले आहेत ते इथून पुढे होऊ नयेत याची खबरदारी घेण्यासाठी कंपनीने योग्य ती उपाययोजना तात्काळ करावी अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोडवेज कंपनीस दिलेला आहे.