पिलीवच्या ऐतिहासिक नगरीत पहिल्यांदाच रंगणार PPL चा थरार : दहा लढतींनी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला !

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव पंचक्रोशी मधील क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरलेली पिलीव प्रीमियर लीग (PPL) 2026 स्पर्धा शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.पिलीव येथील ॲड.मानसिंह जहागीरदार क्रीडा संकुल येथे सकाळी 9.00 वाजल्यापासून सामन्यांना प्रारंभ होणार असून दिवसभर एकूण 10 रोमांचक सामने खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेत इरफान पठाण 11, अमोल सरपंच 11, सोमा भैस 11, मातोश्री मेडिकल 11 आणि विशाल जनवर 11 असे एकूण पाच संघ उद्याच्या सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहेत.प्रत्येक सामना चुरशीचा होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असून परिसरातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा सामना समितीच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.

स्पर्धेतील पहिला सामना सकाळी 9.00 वाजता इरफान 11 विरुद्ध सरपंच 11 यांच्यात होणार असून त्यानंतर तासागणिक सामने रंगणार आहेत.अंतिम साखळी सामना सायंकाळी 6.00 वाजता विशाल 11 विरुद्ध सरपंच 11 यांच्यात होणार आहे.

स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी आयोजकांनी खेळाडूंना वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व खेळाडूंनी ट्रॅक पँट व स्पोर्ट्स शूज परिधान करणे बंधनकारक असून नियोजित वेळेत मैदानावर उपस्थित न राहिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सामना समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिलीव प्रीमियर लीग (PPL) 2026 च्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्रिकेटला चालना मिळत असून नवोदित खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उत्कृष्ट व पारदर्शक नियोजन,दर्जेदार सामने आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी माळशिरस टाइम्स पुढे बोलताना व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *