पिलीव प्रीमियर लीगसाठी 150 खेळाडूंची पारदर्शक ऑक्शनद्वारे निवड : शुक्रवारपासून रंगणार क्रिकेटचा थरार !

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव व पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून,बहुचर्चित पिलीव प्रीमियर लीग (PPL) स्पर्धेतील एकूण 150 खेळाडूंची श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉल,पिलीव येथे ऑक्शन पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काल निवड करण्यात आली.

या स्पर्धेत पिलीव,चांदापुरी, पठाण वस्ती,बचेरी,शिंगोर्णी, सुळेवाडी,काळमवाडी व झंजेवस्ती या गावांतील खेळाडूंनाच संधी देण्यात आली असून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांकडून राबविण्यात आला आहे.

स्पर्धेची सुरुवात शुक्रवार दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 9:00 वाजता होणार असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदाच्या पिलीव प्रीमियर लीगमध्ये विविध संघांचे मालक म्हणून स्थानिक व्यावसायिक व प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाली आहेत.त्यामध्ये समीर(शेठ )सय्यद, प्रकाश (आबा)जाधव,अविनाश घमीरे, सोमनाथ भैस,अजय खुर्द,श्रेयश मदने,विशाल जनवर,अंकुश भैस,इरफान पठाण, व आदिकराव माने या दहा जणांचा अधिकृत संघ मालक म्हणून समावेश आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार असून, खेळाडूंमध्ये संघ निवडीसाठी झालेल्या ऑक्शन प्रक्रियेला उपस्थितांनी पारदर्शक व कौतुकास्पद उपक्रम म्हणून दाद दिली.

पिलीव प्रीमियर लीगमुळे संपूर्ण पंचक्रोशीत क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला असून, स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचे सामना समितीच्या सभासदांकडून माळशिरस टाइम्सशी बोलताना सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *