गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहीमेचे माळशिरस तालुक्यात 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजन – डॉ.रामचंद्र मोहिते
पिलीव/प्रतिनीधी
महाराष्ट्र शासनामार्फत येत्या 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर २०२२ अखेर सर्वत्र गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेमध्ये 82 विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केलेले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की या लसीकरण मोहिमेमध्ये गोवर रूबेला आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या विशेष लसीकरण मोहिमेत ज्या बालकाचे गोवर रूबेला लसीकरणाचे डोस देण्याचे राहिले आहे किंवा डोस चुकलेले आहेत अशा बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
9 महिने ते 1 वर्षाच्या आत पहिला डोस व 16 ते 24 महिन्याच्या आत दुसरा डोस दिला जाणार आहे.त्याच्या बरोबर अ जीवनसत्त्व चा डोस घेणे महत्त्वाचे आहे. जर गोवर-रुबेलाचा डोस चुकला असेल तर जास्तीत जास्त 5 वर्षाचे बाळ होईपर्यंत दिला जाऊ शकतो.जर आपल्या बाळाचे लसीकरण राहिले असेल तर गावातील आशा स्वयंसेविका,अंगणवाडी ,आरोग्य उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा.जर कोणाला ताप आणि अंगावर पुरळ आली असेल तर त्यांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा.असे आवाहन माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी
डॉ.रामचंद्र मोहिते यांनी केले आहे.