धम्मचक्र प्रवर्तनदिनी बाबासाहेबांच्या भाषणाचे जाहीर वाचन करावे – डॉ.सुभाष वाघमारे

पिलीव/प्रतिनिधी
धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणजे एक दिवसाचा उत्सव नसून प्रज्ञा ,शील.करुणेचा जीवन मार्ग काय आहे हे समजून घेण्याचा दिवस आहे.बौद्ध धम्म हा प्रज्ञावान आहे.मनाच्या सूक्ष्म रचनेचे ज्ञान त्याद्वारे होते. विषमता नाकारून समतेचा जीवन मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारपूर्वक दिला. ३० वर्षे वाट पाहून, माणसाच्या वृत्तीत बदल होत नाही हे जाणून मानवी हक्क व न्यायासाठी आशावादी असा बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला. १५ ऑक्टोबर १९५६ चे भाषण हे भारतातील सर्व गरिबांच्या जीवनात नवा प्रकाश देणारे असून महाराष्ट्र शासनाच्या खंड १८ मध्ये पान नंबर ५१४ मध्ये असलेल्या बाबासाहेब यांच्या या भाषणाचे जाहीर वाचन या दिवशी करावे, असे मत परिवर्तनवादी साहित्य अभ्यासक डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.

गोडोली सातारा येथे पंचशील प्रसारक मंडळ यांनी आयोजित केलेल्या धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी वामन मस्के उपस्थित होते.या कार्यक्रमास लुंबिनी संघाचे अध्यक्ष डॉ.गोरख बनसोडे, धम्म बांधव समितीचे सल्लागार अॅड. .विलास वहागावकर, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर , प्रा.रमेश म्हस्के,अरुणाताई म्हस्के,संकेत म्हस्के ,योगेश म्हस्के ,इत्यादी उपस्थित होते.
१४ व १५ ऑक्टोबर १९५६ साली झालेल्या धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचा साद्यंत इतिहास सांगून बाबासाहेब यांचे भाषणाचा संदर्भ देताना ते म्हणाले या मी हिंदू जन्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही ही येवले येथे केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाल्याचे आनंद व्यक्त करताना मला हर्ष वायू झाल्याचे सांगत मी नरकातून सुटलो ,अशी प्रतिक्रिया बाबासाहेब देतात. नाग लोक हे आर्यापेक्षा सुसंस्कृत होते.आर्यांचा विजय हा ते घोड्यावरून लढत होते म्हणून झाला .नाग लोकांचे पायदळ होते ..आर्य आणि अनार्य संघर्ष झाला.त्यात नागांचा पराभव झाला .गौतम बुद्ध हा हा नागांना भेटलेला महापुरुष होता असेही त्यांनी सांगितले आहे. भारतात बौद्ध धम्माचा प्रसार हा नाग लोकांनी केला .आपली कष्टाची भाकरी खाऊन आपण इज्जतिने व सदाचाराने राहिले पाहिजे, धर्म हा जगण्याचा उत्साह वाढवण्यासाठी असतो.ज्या धर्मात समता नाही त्यामुळे कुणाचाही उद्धार होणार नाही, आपला उत्साह वाढावा म्हणून आपण चळवळ केली पाहिजे .आपले सरंक्षण करणारी माणसे समाजात निर्माण झाली पाहिजेत .सर्वांचा उत्कर्ष बौद्ध धम्मात होईल .बौद्ध धम्म हा सागराप्रमाणे विशाल आहे .बौद्ध धम्मात आल्यावर जात जाते आणि आपण समान होतो.धर्माची खरी गरज ही गरिबांना आहे.गरिबांना आशादायी धर्म बनवतो.काही घाबरू नकोस ही त्याची आश्वासकता आहे.उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे मी झगडून बाहेर पडेन हा विश्वास धम्म देतो अशी मते देखील बाबासाहेब यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
बौद्ध धम्म घेतल्याने सवलती जातील ,बुद्ध धम्म हा भारतात कुठेच नाही मग का घेतला ?बाबासाहेबांनी धम्म देऊन म्हारा-मांगाच्या पोटावर पाय दिला, इतके दिवस का धर्म बदलला नाही ?असले प्रश्न अनेक त्यावेळी करण्यात आले.पण बाबासाहेब यांनी निर्भयपणे तर्क सुसंगत उत्तरे दिलेली या भाषणात आढळतात . बौद्ध धम्म हा बहुजन हिताय ,बहुजन सुखाय असून बौद्ध धम्म हा या काळात शून्यवत असला तरी याच धम्माने देशाचा आणि जगाचा उद्धार होईल असे त्यांनी सांगितले .शाळेत झाडलोट करणारी बाई मला जातीवरून शिवून घेत नसे .मग उत्साह कसा निर्माण होणार ?जगात ९० टक्के माणसे दुःखानी पिडीत आहेत गरीब माणसाना दुःख मुक्त करणे हाच धर्म आहे.मार्क्स देखील हेच सांगतो असें मत बाबासाहेब यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले .बुद्धाचे वैशिष्ट्य हे की त्यांनी ईश्वर ,आत्मा ,यांना स्थान दिले नाही .बहुतांशी धर्म ईश्वर जगाचा निर्माता मानतात.पण बुद्धाने जीवन कसे जगायचे हा मार्ग सांगितला.राजा मिलिंद आणि भन्ते नागसेन यांचा संवाद झाला असता मिलिंदने धर्मास ग्लानी कशी येते ,असे विचारले तेंव्हा त्याचे उत्तर भन्ते नागसेन यांनी दिले ,ते म्हणाले की एक तर एखादा धर्म कच्चा असेल आणि गांभीर्य नसेल तर ग्लानी येते , दुसरे म्हणजे धर्मप्रसार करणारे विद्वान नसतील तरी ग्लानी येते म्हणून धर्म ज्ञान सांगायला हवे ,विरोधकाशी वादविवाद करण्यास धर्म प्रसारक सिद्ध नसतील तरी धर्माला ग्लानी येते .आणि तिसरे म्हणजे धर्म तत्वे न जाणता केवळ श्रेष्ठ म्हणून विभूतीपूजा करत बसले तर ग्लानी येते .ही कथा बाबासाहेब यांनी सांगून पुढच्या काळात केवळ पोटाचे पाईक न बनता हा धर्म प्रसार करून सर्वाना बरोबर घ्यावे ,मी बौद्ध दीक्षा देण्याचा अधिकार प्रत्येकास देतो असे देखील बाबासाहेब म्हटल्याचे त्यांनी सांगितले. सम्राट अशोक यांनी धम्म प्रसार कसा केला ही माहिती देखील त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात जेष्ठ कार्यकर्ते वामनराव मस्के म्हणाले ‘’सध्या विषमतेने रौद्र रूप धारण केले आहे .या अन्यायाविरोधात धम्म विचाराने वाट करून देत समाजात निर्भयता आणली पाहिजे.आपल्या चांगल्या आचरणाने आपला धम्म सर्वांच्या जीवनात उपकारक कसा हे सिद्ध केले पाहिजे. नित्यनेमाने दररोज जयभीम घालावा –ती आपली उर्जा ,आणि प्रेरणा आहे ’’
प्रारंभी त्रिसरण,पंचशील ग्रहण करण्यात येऊन बुद्ध वंदना अरुणाताई म्हस्के, साधना म्हस्के, शोभा म्हस्के ,छायाबाई म्हस्के व इत्यादीनी सर्वांनी म्हटली.तथागत गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,यांना यावेळी अभिवादन करण्यात आले . पंचशील प्रसारक मंडळ गोडोली चे अध्यक्ष संकेत म्हस्के यांनी तरुणांनी २०१६ पासून विविध कार्यक्रम केल्याचा आढावा घेतला .प्रा.रमेश म्हस्के व योगेश म्हस्के यांनी सर्वांचे स्वागत केले .अरुणाताई म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .जालिंदर म्हस्के यांनी आभार मानले.या कार्यक्रमास कोविड -१९ चे संदर्भात शासनाचे नियम पाळत निवडक उपासिका आणि उपासक उपस्थित होते.